मराठी भाषांतरित साहित्याने वाचकांची अभिरुची समृद्ध केली
- Country : India
- Subject :
आजच्या जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर भाषांतरित साहित्याला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. जगातील विविध देश, त्या देशांतर्गत अनेक प्रदेश आणि भाषा यांच्यामध्ये सांस्कृतिक आणि वाङ्मयीन देवाण-घेवाणीची आजच्या काळात खूप जास्त गरज निर्माण झाली आहे. संवादाच्या अशा गरजेतूनच साहित्याची भाषांतरे केली जातात. या भाषांतरित साहित्याने मराठी वाचकांची अभिरुची समृद्ध केली आहे. ग्लोबल व्हिलेजमधील सारी वाचनप्रेमी माणसे जणू वाचन आणि अभिरुचीच्या एका अंगणात बसलेली असून त्या भाषांतरित पुस्तकातील चिरंतन मानवी मूल्यांचा एकाच पातळीवर अनुभव घेत आहेत, परस्परांशी अविरत संवाद करत आहेत; आणि एकमेकांच्या संस्कृतीच्या देवाणघेवाणीच्या गोष्टी परस्परांशी जणू करत आहेत, असे चित्र आज भाषांतरित साहित्यामुळे दिसून येते.
‘ट्रान्सलेशन’ हा शब्दच मुळात लॅटीनमधून आलेला आहे. ट्रान्स म्हणजे पलीकडे आणि लेशन म्हणजे नेणे . आपल्या विश्वाच्या पलीकडे ही भाषांतरित साहित्य वाचकाला घेऊन जाते. त्यामुळे कलाकृतीतील काळाच्या विवक्षित तुकड्याचे दर्शन तर घडतेच; पण त्या त्या प्रदेशातील नैसर्गिक वातावरण, संस्कृती, रितीरिवाज, राहणीमान, बोलीभाषा या सगळ्यांची माहिती वाचकाला होते. भाषांतरकाराजवळ शब्दप्रभुत्व व सर्जनशीलता असली आणि मूळ लेखकाच्या भावनात्मक प्रतिभेशी त्याचा सूर जुळला की दोन्ही भाषांमधील द्वैत संपते आणि त्या कलाकृतीचा आस्वाद घेताना अलौकिक आनंद मिळतो.
Comments
No have any comment !